रस्ता,वळण,झाडी


🔶सुंदर सुंदर वळणाची
नागमोडी वाट
गाडीतून पहाताना
असंख्य चित्रे डोळ्यासमोरून
भुरकन जात
त्याच त्याच रस्त्यावरून
परत परत जाता
गतजिवनातील आठवणींनी
मन उचंबळुन येई
माझ्या माहेरची मला
आठवणच येई
परत परत वाटे
त्याच त्याच रस्त्यावरून जावे
निसर्गाच्या कुशीत झोपुन जावे
वंदना नागरगोजे
🔺🔺🔺🔺🔺🔺🔺

🔶वळणाची वाट
आणि अवघड घाट
दिस जातील सरुन
असता तुझी रे साथ
अनिता लुगडे
🔺🔺🔺🔺🔺🔺🔺

🔶गतस्मृती उजळल्या
निसर्गाच्या कुशीत रमल्या..
या वाटेवर चालतांना
नजरेसमोर आल्या..।।
याच अनोळखी वाटेत
आपले नाते जुळले..
जीवनातील सहप्रवासी
जीवनसाथी झाले..।।
    
सौ. कल्पना देशमुख
🔺🔺🔺🔺🔺🔺🔺

🔶रस्ता....
घडवणारा
पढवणारा
जोडणारा
तोडणारा..
कोवळ्या जीवाला
जीवनचक्रात फिरवणारा
वाळणावळणावर
नवनिर्मितीचा आनंद देणारा..
सतत चालणारा
सोबत करणारा
तरीही आपलं अवकाश
सांभाळणारा...
आपल्यासोबतच
वयाने आणि अनुभवाने
समृद्ध होणारा..
योग्यायोग्याची
जाणीव करून देणारा..
वळणावळणाचा
नागमोडी...
यौवनातल्या भावनांसारखा...
तरल कधी चंचल
कधी सोबत धावणारा...
कधी सरळ निर्विकार
बाबांच्या विचारांसारखा..
वरवर सगळं सरळ
पण तेवढाच तिव्र आणि खोल..
कधी सालस,समजूतदार
जोडीदारासारखा
तेवढाच अवखळ आणि
हवाहवासा...
कधी माहेरच्या ओढीने
धावणारा
कधी परतीच्या नाराजीचा..
कधी नावापरिणितांसारखा..
संपूच नये असा वाटणारा...
कधी भावंडांसारखा अल्लड
आणि धमाल मस्तीचा...
कधी भूत भविष्य जोडणारा
कधी नकोस अंतर तोडणारा..
जन्मापासून शेवटपर्यंत
सोबत करणारा..
आनंद आणि अंत
निर्विकारपणे वाहणारा..
रस्ता..
साक्षीदार आपल्या प्रत्येक प्रवासाचा...
साक्षीदार आपल्या प्रत्येक सुख दुःखाचा...
सदैव आपल्याला सोबत करूनही
स्वतःच वेगळेपण जपणारा..
गाव,नाती,माती आणि ओढ
सगळं सांधायची याला भारी खोड..
टक्के टोणपे,आणि भरपूर ठेचा
यांच्यामधून जगण वेचा...
असा हा रस्ता
मला म्हणाला मुंगी बघ
उतरव तुझ्यात तिची रग..
एकेक पाऊल पुढे टाक
मोजू नको अंतर
आहे नाही याचा सारा
हिशोब करू नंतर...
मिटव पहिली तुझी
अंतरे अंतरातली...
पुसून टाक जळमटे
आत आत जी साठली..
धर हात माझा
नव्या वळणावर चल
काढून टाक सगळे
नको जुने सल..
हिरवी गच्च झालर..
पत्थरांचा घाट
ओलाव्याचा थाट
अन..
आयुष्याची नवी वाट...
शुभांगी कदम
🔺🔺🔺🔺🔺🔺🔺

सुंदर हे जीवनगाणे
मज शिकवी पुढे पुढे जाणे
परत फिरूनी न पहाणे
तरी गतस्मृतींना उजाळा देणे!!
डॉ.अस्मिता भस्मे

धन्यवाद!

#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#चित्रकविता

Comments

Popular posts from this blog

निष्पर्ण झाड

मधमाशी पोळे

दवबिंदू आणि निसर्गचित्र