दसरा

दसरा
जांभळी मनाची बाग सुरांचे राग जांभळ्या ताना
घन गर्द जांभळी सांज जांभळी गाज जांभळा कान्हा.
पाठीवर जणु वळकटी, बाक तो कटी, मिरवते कुब्जा
वाकून चुंबिते चरण, हरीचे कवन, अंतरी पूजा
स्पर्शतो हरी झणि तीज, कण्यातुन वीज, ताठला बाणा
जांभळा शिरी सरताज, यादवी साज, गोकुळी राणा
मयसभा जरी रंगली, लाज लाजली, हरवला जाब
जन्मात भोगली तिने, कटू वर्तने, भंगला आब
घातला तिच्या पदरात, वैषयी हात, विव्हळते कृष्णा
धावला तिच्या विश्वात, रोखला घात, नेणता जाणा
जांभळी मनाची बाग सुरांचे राग जांभळ्या ताना
घनगर्द जांभळी सांज जांभळी गाज जांभळा कान्हा.
शिवानी गोखले.

आला दसऱ्याचा सण
दारी झेंडूचे तोरण
या सणाची महती
घेऊया जाणून।
करू शस्त्रांचे पूजन
हार नारळ वाहून
नसे आराम तयाला
कार्य तयाचे महान।।
करू सरस्वतीचे पूजन
पाटी, पुस्तक लेखणी
धूप दीप ओवाळीते
तूच विद्येची जननी।
करू अपराजिता पूजन
अष्टदल रेखाटले
मूर्ती स्थापना करून
विजयी भवः आशीष तू दिले।।
करू शमीचे पूजन
विजयाचे ते प्रतीक
बहुगुणी शमीपर्णे
करी दोष निवारण।
सीमोल्लंघन करूनी
रावणासी युद्ध केले
श्री राम-हनुमंताने
लंका दहन केले..!!

सौ. कल्पना देशमुख

नवरात्रीचा जागर
दिशदिशात जयकारा
बघावं तिकडे भवताली
mee too चा हा मारा
बाईच बाईपन समजून घ्या जरा
उठसूट सगळ्याची मग चर्चा करा
निर्मात्याने घडवले दोन जीव
बांधून शरीराची शीव
पेरण आणि धरणं
भूमिका या दिल्या दोन
तेंव्हापासून अलिखित सारं
पुसायला होत कोण?
चेपत गेली भीड तसं
वासरू वारं प्याल
बेभनासंग कसं
कोडगही झालं...
भावनांचा आदर आणि
माणुसकीचा ध्यास
विसरून सारं मर्म
उपभोगाचा हव्यास...
अतिची होते माती...
संपणारी नाती..
एकमेकांसमोर
माणस झाली कोती...
दिखाव्याचा भस्मासूर
स्टेटसच्या तऱ्हा
जो तो सांगे आपलं झाकून
गड्या मी बरा...
म्हणतात शिक्षणाने मिटवली
बाई पुरुषातली दरी
अभासांचीच दुनियाच
आता वाटते खरी...
ज्याला त्याला हवं
टाळूवरच लोणी
चुकत जायचं सगळ्यांनी
जबाबदरी घ्यायची कुणी?
अन्याय झाला तर
भीड कशाला हवी
दाखव हिम्मत आणि
शोध वाट नवी..
बोलणाऱ्याची विकते माती
बोलायला शिक
न्याय मिळव
न्यायासाठी मागू नको भीक
फरक नाही पडत
तू नर का मादी
अन्याय सहन करण्यापेक्षा
आवाज उठव आधी..
नको बघू सोय सदा
नको बघू परिणाम
नको दबून राहुस आणि
नको घेऊ दाम...
पटल नाही तर
आवळ तुझी मूठ
उठव रान सार
तुही पेटून उठ..
देवीसमोर जुळतात
तुझे पोलादी हात
चुकीच्या विरोधात
बरोबरचे देतील साथ
मग मात्र उतायच नाही
मातायच तर मुळीच नाही
आपलं भल करताना
इतरांना त्रास द्यायचा नाही
आणि विनाकारण कुणाकडून
काहीसुद्धा घ्यायचं नाही..
देवीला समान सारी
पोरं आणि पोरी
कशाला कुणाचं शोषण
आणि कशाला नको ती यारी..
एक हाताने तर
टाळीसुद्धा वाजत नाही
ज्याचा त्याचा अंतरात्मा
ज्याचं त्याचं कर्म पाही..
नवरात्रीचा जागर सांगे
रोज नवे रूप
माया ममता,वात्सल्य करुणा
काली चंडीही..क्या खूब..
मान किंवा मानू नकोस
रागवत नाही "आई"
सदाचाराने वाग म्हणजे
"mee too" राहणार नाई..
-©शुभांगी कदम
धन्यवाद!
#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#चित्रकविता

Comments

Popular posts from this blog

निष्पर्ण झाड

मधमाशी पोळे

दवबिंदू आणि निसर्गचित्र