मातीतील पान

शैलजा

माती, पाणी, आणि उजेड 
मिळता अंकूर वाढू लागतो
फळे, फुले अन् पाने देण्या
देह तयाचा नित्य जागतो  

रानामधला कोंब एकला
एकांताला भीत नसे
वाढत राहणे काम तयाचे
हीच तयाची रित असे
◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾

कल्पना देशमुख 

नभी लपलेल्या चांदणीला
रवि खुणावतो  जरा
उजळल्या बघ,दशदिशा
आवर तूझा पसारा..

सांजवेळी अस्ताला जातांना
होऊ दे तूझे आगमन
क्षणिक भेट जरी आपली
देईन तूजला आलिंगन.
◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾

 वैशाली राणे

 पानं मातीत मिसळते,
बीज अंकुरता जणू पुन्हा जन्म घेते..
आयुष्य अवघे खेळ नियतीचा,
उत्पत्ती स्थिती लय, नियम निसर्गाचा..
जीवनाचे असे पूर्ण होता आवर्तन,
नवचैतन्याचे जणू हे परिवर्तन..
◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾

स्मिता परदेशी

इवलासा कोंब तो उठे तरारून
पाहे जगाकडे पान उंचावून 
होई शहाणा तो जगा न्याहाळून
आजूबाजू पाहे गेली पाने ती वाळून

शहारतो जीव ऊन पावसाची भीती 
धीर देत भिजविते खाली काळीशार माती
जरा मरण ही असे कालचक्राचीच गती
इवलासा जीव तो पहा शिकवितो नीती 
◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾

 कल्पना देशमुख 

 अष्टाक्षरी रचना

सुकलेली पानगळ
वाट पाहे पावसाची
बीज अंकुरले धरा
कृपा अमृत धारेची ।।

सिंचनाने बहरेल
उंच नभी झेपावेल
आता दिसे इवलासा
वृक्ष छाया देईल  ।।
◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾

 नीता धोडपकर 

सुकलेली पाने
कोमेजली धरणी
परि उमलले रोप
पहा ईश्वरी करणी !
        
बोध घेई मानवा रे 
नाही सरळ जीवन
इवल्याशा आशेतून
कर चैतन्य निर्माण !
   
#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#चित्रकविता

Comments

Popular posts from this blog

निष्पर्ण झाड

मधमाशी पोळे

दवबिंदू आणि निसर्गचित्र