शब्द- अबोला



शब्द- अबोला

चंदा वाडकर

बोल ना माझ्या प्रीत फुला
का मनी धरतोस अबोला?
काय गुन्हा झाला माझा
पुढ्यात येऊन सांग मजला !

तुज ठाऊक आहे ना
तुजविन मी नाही कोणी!
 सख्या का छळतोस मला?
अबोला  सोड या कातर क्षणी!

तुजशिवाय मज काही सुचेना
नयनातील अश्रू बघ सुकलेना!
काळीज तीळ तीळ तुटलेना
सख्या आता तरी माझ्याशी बोलना!

पुरे झाले तुझे बहाणे 
तुझ्या चरणी ह्र्दय ठेविलें!
तुझ्याविना सख्या जगू कशी?
 प्रेमाची बोलणी कर ना माझ्याशी ! 
◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾

स्मिता परदेशी

शब्दांची केली उधळण
पण भाव अबोलच राहिला
ओठांनी वदले काही
डोळ्यात अर्थ ना पाहिला

तार मनीची जुळता
शब्दांना नुरतो अर्थ 
तव प्रेमाचा एक कटाक्ष 
जगणे करीतसे सार्थ

तू नकोच बोलू काही
लटकाच तुझा हा रूसवा
जाणते परी हिरमुसते
पाहून अबोला फसवा..
◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾

 कल्पना देशमुख

दिनरात तूझा चेहरा
स्वप्नात नित्य येतो
अबोल या प्रीतीला
सप्तसुरांनी छेडतो ।।

प्रेमाची आर्त साद
तू,एकदा तरी ऐकना
आता पुरे हा अबोला
शब्द ओठातील भावना ।।

नकोच मुळी अबोला
घुसमटणारे ते द्विधा मन
ओसंडून वाहू दे प्रीतझरे
व्हावे दोन जीवांचे मिलन ।।

आतुरले तव भेटीस
मनमोर फुले ह्रदयांगणी
वचन दे,मज चंद्र साक्षी
तूच माझी जीवनसंगिनी ।।
◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾

ऋतुजा गवस

तुझा अबोला
माझे काळीज चिरी
साश्रू नयनांत
तुझाच वेध घेई

तुझा अबोला
जीव कातर कातर
हृदयी धडधड
मनी तुझाच वावर

तुझा अबोला
उरी वादळलाटा
अव्यक्त भावनांची
मौनातील प्रेमळछटा

तुझा अबोला
नयन धोका देती
मनीचे गूज  सांगती 
हृदयी साद घालती
◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾

नीता धोडपकर

झाला जरी उशीर सख्यांनो
धरु नका अबोला
बंध पाश हे या जगतीचे
अडविती बहु मजला !
श्रीम. नीता रा. धोडपकर
◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾

चंदना उतेकर

भावना बेबंद होऊन 
डोळ्यांतून वाहू लागतात 
शब्दाविना खूप सारे 
अर्थ कळू लागतात

 हुंदक्यांचे स्वर अन्
 शब्दांचेचं अश्रू होतात 
थरथरणाऱ्या अधारांतून मग
अबोल भावना बोलू लागतात
◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾

अस्मिता भस्मे
 
रूष्ट मनाने धरला तुझ्याशी अबोला ...
हिरमुसले मन की तुझ न कळला...
जेव्हा तुझ्या मनीचा भाव मज समजला....
तेव्हा कठोर मनास या पाझर फुटला....
तत्क्षणी निरधार पक्का झाला....
फिरूनी कधी न धरेन अबोला....
                
#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#शब्दकविता

Comments

Popular posts from this blog

निष्पर्ण झाड

मधमाशी पोळे

दवबिंदू आणि निसर्गचित्र